Support Wikipedia

Wikipedia Affiliate Button

Tuesday, September 9, 2008

कधी कधी...

तुमच पण कधी कधी असच होत का हो?

म्हणजे तुम्ही खूप काही अपेक्षा न ठेवता वगैरे काहीतरी करता, आणि खरच तुमचा 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलुषु कदाचन' वगैरे गोष्टिंवर विश्वास असतो किंवा 'मी हे सगळ माझ्या आनंदासाठी करतो' अशी पण तुम्ही स्वत:ची समजूत घालून घेता. एखादा षड्रिपू तुमच्यावर हल्ला करायला आला की तुम्ही पळुन न जाता त्यालाच चितपट करता. किंबहुना निस्वार्थीपणा, तत्त्व तुमच्यात अगदी साखरआंब्यासारखी मुरलेली असतात. लोक तुम्हाला चाखून जातात आणि त्यांच्या चेहर्यावर आलेला गोडवा पाहून तुम्ही खूष होता. कधीतरी शालेत वाचलेली सुभाषित, सुविचार आठवतात. ते वाटसरुला सावली देणार झाड वगैरे आठवत आणि तुम्ही स्वतः खूष होता... स्वतःवरच...

किंवा असही होत कि अवघड जागेला तुम्ही इतरांच्या मदतीसाठी उभे रहाता. लोकांना आधार देउन वर जायला मदत करता. खालच्या लोकांनाही हात देउन वर आणता. तुमच्यासाठी हे खाली-वर वगैरे सगळ सापेक्ष असत. आणि तीच लोक नंतर धन्यवाद देउन निघून जातात. पण ती लोक मनानी काही वाईट नसतात. शेवटी कुणीच वाईट नसत. पण ते पुढे निघुन जातात, तुम्ही कसे वर याल याची काळजी न करता. तुम्ही म्हणता, त्यांना कदाचित ईतर काम असतील, तुमच्यासाठी थांबले नाही म्हणून बिघडल कुठे? तुम्ही मदत केलीत ना... आणि तुम्ही स्वतः खूष होता... स्वतःवरच...

मग कधीतरी तुम्ही असेच चित्र काढत बसलेले असता. तुम्ही खरच खूप सुंदर चित्र काढता. लोकांनाही ते आवडत, लोक येतात, वहावा करतात. तुमच्याबरोबर फोटो वगैरे घेतात. आणि निघून जातात. तुम्हाला लोक नमस्कार करतात, हात जोडतात, तुम्हाला खूप आदर देतात. पण कोणीच तुमच्याबद्दल, तुमच्या चित्राबद्दल काहीच विचारत नाहीत. लोकांनी तुमच कौतुक केल ना? तेच तुमच्यासाठी खूप असत, तसही तुम्ही फळाच्या अपेक्षेनी काहीच करत नसता... आणि तुम्ही स्वतः खूष होता... स्वतःवरच...

कदाचित असही होत की तुम्ही एकटेच रस्त्यानी जात असता. कुठुनतरी तुमच्याच दिशेनी जाणारा जथा येतो माणसांचा. मग तुम्ही तुमचा वेग कमी करता. त्यातल्या प्रत्येकाशी बोलता, गप्पा मारता अर्थात तुमचा वेग कमी ठेवूनच. पण लोक 'आलोच' म्हणतात आणि पुढे जातात. तुम्ही कुणाची वाट नाही पहात, पण तुम्ही वेग वाढवतही नाही. तुम्ही त्या जथ्यातल्या प्रत्येकाशी तसेच बोलत रहाता, तितकच लाघवीपणे, मनापासून. कारण तुम्ही सगळ तुमच्या आनंदासाठी करता, लोकांच्या आनंदातच तुमचा आनंद असतो. तो जथा पुढे निघून जातो. दुसरा येतो. तुम्ही तसेच बोलत रहाता. याच आनंदात की आधी मी एकटाच होतो, आता माझ्याबरोबर कितीतरी लोक आहेत... आणि तुम्ही स्वतः खूष होता... स्वतःवरच...

म्हणजे तुम्ही खरच खूप चांगले असतात. बाकीचे पण ते मान्य करतात. आणि अर्थातच बाकिचे पण चांगलेच असतात. पण मग अस असेल तर तुम्ही कोणालाच 'आपले' का नाही वाटत? कोणी तुम्हाला त्यांच्याबरोबर घेऊन का नाही जात? कदाचित तुम्ही त्यांना फारच आदर्श वाटता, रस्त्यावरचा लोकांना मदत करणारा फलक एकटाच असतो. अशी तुम्ही तुमच्या मनाची समजूत घालता... पण यावेळी मात्र तुम्ही स्वतःवर खूष होत नाही....

खरच होत का हो तुमच अस कधी कधी?