मी तसा को एड चा नाही. नाही म्हणायला यत्ता चौथी पर्यंत वर्गात हा दुसर्या प्रकरचा प्राणी असायचा, पण तेव्हा आम्ही इतके लहान होतो कि त्या प्राण्याकडे फारस कधी लक्शच गेल नाही. आणि आता तर त्यांचे चेहरेही आठवत नाहीत.
पण त्यानंतरची ६ वर्ष म्हणजे तर अर्धा वनवासच होता. आणि मजा अशी की त्यानंतरही तो तसाच चालू राहीला. आता याला वनवास म्हणायच कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण सध्याची एकंदर मानसिकता बघितली, तर ते मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.
बहुतांश सगळीच असल्या अस्सल मराठी शाळांमधली मुल (पुण्याच्याच बाबतीत बोलायच झाल तर रमणबाग, मॉडर्न(ही फ़क्त नावतच मॉडर्न आहे), गरवारे, भावे वगैरे अफलातून शाळा) नंतरच्या आयुष्यात "कुणी एक गर्लफ़्रेंड देता का गर्लफ़्रेंड" असल्या अवस्थेत फिरत असतात. मुलींच्या बाबतीत काही कल्पनेला खूप वाव असला तरी फारशी काही माहीती नाही.
आता असल्या शाळांमधल्या मुलांना ८ ते १० मधे मुलांची मुलींकडे बघायची 'नजर' काय असते हे वेगळ सांगायची गरज नाही. याला अपवाद फ़क्त तुलनेनी मवाळ(म्हणजे केशव, साजूक तूप, चमन) मुलांचा. या वेळी वर्गात होणार्या चर्चा आणि माहितीची देवघेव ही अत्यंत शेलकी (आणि कोणी ऐकली तर हीन दर्जाची वगैरे) असते.
पण तरीही माझ्या अनुभवानुसार अशा मुलांमधे नंतर मुलींबद्दल जास्त आदराची भावना दिसते. जरी मुलींशी बोलण्याची हातोटी आणि सहजपणा कमी असला तरीही. म्हणजे एकूणच मुलींशी त्यांची interaction कमी असूनही त्यांचा समजूतदारपणा जास्त असतो.
याउलट इंग्रजी माध्यमाची मुल(आणि co-ed वाली) वागण्यात जास्त सहज असली तरी बेजबाबदार वाटतात.
तरीही मी इथे जे काही लिहितो आहे ते या व्यवस्थेच्या बाजुनी नाही, असल तर विरोधातच आहे.
याची आठवण यायच कारण म्हणजे एकतर मिलिंद बोकील यांच 'शाळा' हे पुस्तक आणि नुकतीच आलेली 'एकत्र शिक्षण पद्धती नसलेल्या शाळांमधील मुलांची प्रगती जास्त होते' ही बातमी. IQ वाढत असेलही कदाचित, पण EQ च काय? अशा या आपल्या 'अस्सल' शिक्षण देण्याच्या पद्धतीतून भावनांना महत्व न देणारे 'बैल' आणि भावना समजून देखील न घेऊ शकणार्या 'म्हशी'च निर्माण झालेल्या जास्त दिसतात.
नुकतच 'शाळा' पुस्तक वाचल्यावर मनात पहिली प्रतिक्रिया जी आली, ती या लेखाच शीर्षक बनली.
एकत्र शिक्षण न देण्याचे काही फायदे असतीलही कदाचित... पण शाळेतली ती वर्ष बरोबर मुली नसल्यामुळे खरच miss केली अस वाटल. त्यात दाखवलेल निरागस प्रेम आणि आकर्षण हे मनाला चटका लावून आणि त्याचबरोबर मनाला कुठेतरी आत आपण याचा(किंवा असा) अनुभव नाही घेउ शकलो याची रुखरुख पण देऊन गेल.
आता त्या वयात अस काही 'निरागस' वगैरे असू शकत का हा एक खरच अवघड प्रश्न आहे... पण तरीही निदान मुला मुलींना एकमेकांशी नैसर्गिकपणे वागण्याचा अनुभव तरी मिळाला असता.
कदाचित जर एकत्र असतो तर त्यातलीच कोणीतरी 'ती' आयुष्यभराची सोबती झाली असती किंवा एक मनातल सगळ समजून घेणारी मैत्रीण झाली असती असही वाटून गेल. आणि काहिच हाती लागल नसत तर निदान आयुष्यभर पुरणारी प्रेमाच्या निरपेक्ष भावनेची शिदोरी तरी मिळाली असती...
पण कुठल्याच नैसर्गिक भावनांना मान्य न करणारी आपली संस्क्रूती त्या भावनांना लहान असतानाच नष्ट करुन टाकते(प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे). आणि त्यातूनच मुलांकडे संशयानी बघणार्या, आपलच वर्तुळ म्हणजे जग आहे समजणार्या, आत्मविश्वास गमावलेल्या, मुलांशी मोकळेपणानी बोलुही न शकणार्या आणि स्वताशीच कुढत बसणार्या मुली तयार होतात. त्यामानानी मुल मात्र तुलनेनी मोकळ्या आणि समतोल विचारांची(कदाचित बाहेरील जगाशी जास्त संबंध आल्यामुळे) तयार होतात म्हणायला हरकत नाही.
पण काहीही असल तरी या 'शाळा' पुस्तक शेवटी, च्यायला आम्ही साले non co-ed वाले हा असा काही काळजाला भिडणारा अनुभव घेउच शकलो नाही, आणि आम्हाला तसच बनवल्यामुळे कदाचित पुढच्या आयुष्यात पण असा प्रेमाचा अनुभव घेऊ शकणार नाही अशी भावना देउन आणि मन खूप अस्वस्थ करून गेल...
1 comment:
खरंय. . .व्यक्तिमत्वाचा विकास होताना हा पैलू राहूनच जातो. . .नंतर पोरिंशी बोलायची वेळ आली की फाटते. . .मग बडिशेपेसारखी फ्रेंडशीप मागतो आपण. . .खरंतर शिक्षण एकत्र पाहिजे व शाळा मराठी माध्यमाची हवी
Post a Comment