Support Wikipedia

Wikipedia Affiliate Button

Tuesday, July 15, 2008

किल्ले कुर्डुगड (kurdugad)



आता आम्ही कोण कोण होतो वगैरे सांगत बसत न बसता, सरळ मुद्यावरच येतो.

कुर्डुगड रायगड जिल्ह्यात येतो. मुळशीवरुन ताम्हीणी घाट उतरुन कोकणात गेलो की विळे गावापासून माणगावचा फाटा लागतो(पुणे-विळे : ९१किमी). याच फाट्यावरुन पुढे गेल कि जिते गावाचा फाटा लागतो.(विळे-जिते: २५किमी) जिते गावापासून किल्ल्यावर जायची वाट सुरु होते.(जिते फाटा-जिते : ११किमी)
मात्र किल्ला जिते गावापासून दिसत नाही. किल्ल्यावर जायची वाट २ टप्यात किल्ल्यावर जाते. पहिला टप्पा जिते-कुर्डुवाडी(९०%) आणि दुसरा कुर्डुवाडी-कुर्डुगड(उर्वरीत १०%). ST च्या उपलब्धतेबद्दल काही ठोस माहीती नाही. जित्याहुन किल्ल्यावर पोहोचण्यास सुमारे २.५ तास लागतात.

जिते गावातून गडावर जाण्यासाठी डावीकडील दुसर्या डोंगरावर जायला लागत. छायाचित्रात जिते गाव आणि पहिला डोंगर दिसतो आहे.


From उगाच इकडच तिकडच



ही वाट विजेच्या तारांखालून मात्र जात नाही(आम्ही तारांखालून वर जायचा यशस्वी प्रयत्न केला, पण वाट तिकडुन नाही). जुनी वाट दरड कोसल्यामुळे बंद झाली असली(आम्ही गेलो तेव्हा [जुलै २००८] हि वाट बंद झालेली होती) तरी आता नविन वाट तयार केलेली आहे. माथ्याजवळ वाट कड्याच्या पोटातून उजवीकडे जाते.

छायाचित्रात कुर्डुगड आणि पाठीमागे सह्याद्रीची मुख्य रांग दिसते आहे.



कुर्डुगड किंवा विश्रामगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेत नाही. तस बघायला गेल तर कुर्डुगड कोकणातच म्हणायला हरकत नाही कारण सह्यधारेपासून कुर्डुगड बर्यापैकी सुटा झालेला आहे. (छायाचित्रात सह्यधारा मागे दिसते आहे)
कुर्डुवाडी पर्यंत मुख्य चढण आहे. कुर्डुवाडी एक छोटस गाव आहे, तिथे पोचायला कच्चा रस्तादेखिल अस्तित्वात नाही. कुर्डुवाडीतून गड अगदिच जवळ म्हणजे १० मिनिटांच्या अंतरावर आहे. छायाचित्रात दिसणारा सुळका म्हणजेच गड आहे.

गडावर पहाण्यासारख मात्र फार काही नाही. किल्ल्याचा घेर लहान आहे आणि सपाटी फारशी नाही. किल्यावर खूप बांधकाम देखिल नाही. जातानाचा मुख्य दरवाजा पडलेला आहे(पहा).

दरवाजातून गेल्यावर वाट जवळ जवळ संपते. तिथून पुढे किल्ल्याच्या डाव्या अंगानी वाट पुढे जाते आणि नंतर वर चढते(पहा).

इथे हनुमानाची भंगलेली मुर्ती आहे, मात्र मुर्तीला मंदिर नाही. मूर्ती अत्यंत सुंदर आहे. एकंदर ठेवणीवरून प्राचीन देखील असावी. पुढे बुरुजावर(दरवाजावरील बाजूला दिसणार्या) जायला वाट आहे. किल्ल्यावरील सुळक्यावर जायला सोपी वाट नाही(कदाचित कडा कोसळल्यामुळे बंद झाली असावी). मधील सुळक्यावर गुहा आहेत.

कुर्डुगडावरून दिसणार सह्याद्रीच रौद्ररुप पहाण्यासाठी(अनुभवण्य़ासाठी नव्हे, अनुभवण्यासाठी ढाकच्या बहिरीला जायला हव), निसर्ग सौंदर्यासाठी तिथे एकदा जायलाच हव...

(सर्व छायाचित्रे साई गणेश यांच्या सौजन्याने)



1 comment:

Anonymous said...

भारी. . . पावसाळा व ट्रेकिंग. . .भटकावं तर सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांत. . .प्रत्येक किल्याचा इतिहास समजून घेतला तर ही भटकंती जास्तच आनंद देऊन जाते.